नविन शैक्षणिक सत्राची धुमधडाक्यात सुरुवात .

SHARE

मोताळा : परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा ,वडगाव खंडोपंत येथे शैक्षणिक वर्ष 2024 25 ची धुमधडाक्यात सुरुवात झाली. दिनांक 29 जून रोजी शाळा खोल्या तसेच शालेय परिसर स्वच्छता अभियान राबवून मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच पर्यावरणासाठी वृक्षांचे महत्त्व समजावून सांगून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . गावकऱ्यांनी सदर कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला . दिनांक 1 जुलै रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांची ग्रामीण कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या बैलगाडीतून , ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडीला तसेच शालेय परिसराला फुगे ,फुले तसेच रांगोळ्यांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले . ही अनोखी मिरवणूक पाहून गावकऱ्यांनी कुतूहल व्यक्त केले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन वर्गात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोताळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मनोहर धंदर साहेब,विस्तार अधिकारी श्री डी .डी . पाटील साहेब तथा केंद्रप्रमुख श्री हिरासिंग धीरबस्सी साहेब, पंचायत समितीचे जे .ई . श्री खडके साहेब , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सिताराम सुरडकर, सरपंच श्री विनोद कुमार सावळे, उपसरपंच श्री ज्ञानेश्वर खराटे, माजी सरपंच श्री भुषण पाटील, बाळू पाटील, श्री ढोल ,श्री डिके तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पहिलीतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री श्याम भाऊ लांडे यांचे कडून शालेय दप्तर, पाटी तथा पुस्तकांचे वाटप करण्यात आले व मुलांना गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. दिनांक 3 जुलै रोजी वर्ग पहिलीच्या प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले .
क्षेत्र भेटीने सत्राची सुरुवात
विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील विविध मंदिरे, महापुरुषांचे पुतळे, ऐतिहासिक स्थळे यांचा परिचय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजांची माहिती होण्यासाठी दिनांक 5 जुलै रोजी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये गावातील तथागत गौतम बुद्ध तथा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नेऊन या महान महापुरुषांच्या कार्याचा परिचय देण्यात आला. त्यानंतर गावातीलच बजरंग बली तसेच श्रीराम मंदिरात मुलांना नेऊन त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली . त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामपंचायतचा कारभार कशा पद्धतीने चालतो याबाबत सरपंच पती श्री विनोद कुमार सावळे यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली तसेच ग्रामपातळीवर विविध प्रशासकीय यंत्रणाच्या कामकाजाची देखील माहिती देण्यात आली . त्यानंतर गावाजवळील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राचीन श्रुंगेश्वर मंदिरावर मुलांना नेऊन तेथील मंदिराच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. परिसरात येणाऱ्या पिकांची, तसेच परिसरातील नळगंगा नदीची माहिती देण्यात आली . तेथे मुलांच्या ज्ञानासाठी प्रश्नमंजुषा तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले व सामूहिक भोजन करण्यात आले. शैक्षणिक सत्राची अशी उत्साहवर्धक सुरुवात झाल्याने विद्यार्थी तथा पालकांमध्ये शाळेविषयी नवचैतन्याचे वातावरण तयार झाले व शाळेची गुणवत्ता पाहून गावातील अनेक पालकांनी इंग्रजी माध्यमात असलेल्या आपल्या मुलांना गावातीलच मराठी शाळेत दाखल करण्याचा मानस व्यक्त केला .


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button