बुलडाणा, दि. 05 : पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे विविध जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य सांभाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीज पडणे, पूर परिस्थिती यापासून नागरिकांचे संरक्षण करण्याबाबत उपाययोजना करणे, तसेच पावसाळा सुरु झालेला असताना अशुद्ध पाण्यामुळे अतिसार गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, काविळ यासारखे आजार होतात. आजार होऊ नये म्हणून रोगप्रतिबंधक उपायोजना करणे आवश्यक आहेत. संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचींग पावडरचा पुरेसा साठा ठेवून पिण्याच्या सर्व स्त्रोतांचे नियमित शुद्धीकरण करावे. नळयोजना, हातपंप पाईप फुटणे, तसेच गळती असल्यास संबंधीत ग्रामपंचायतींनी त्वरीत दुरुस्ती करावी.
विहिरी, हातपंप, भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, त्याभोवती पाणी साचले असल्यास पाणी वाहते करावे, खताचे खड्डे व डबके, जनावरांचे मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावून त्यावर जंतूनाशक बीएचसी पावडर शिंपडावी. शेतातील विहिरीचे ब्लिचींग पावडर टाकलेले पाणी पिण्याबाबत जनतेस सूचना द्यावी. तसेच रस्त्यावरील उघडे अन्न खावू नये. नदी, नाले अथवा साचलेले पाणी पिऊ नये. ब्लिचींग पावडरयुक्त पाणी प्यावे, अथवा पाणी गाळून व उकळून थंड करुन प्यावे. जंतूनाशक औषधाची फवारणी झाल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
पिण्याच्या स्त्रोतांचे पाणी नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा येथे तपासणीस पाठवावे. पाणी पिण्यास अशुद्ध असल्यास पाण्याचे शुद्धीकरण करावे. पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतरच पाणी पिण्यास उपयोगात आणावे. अतिसारामध्ये ओआरएसचे द्रावण प्रत्येक चार तासांनी आजारी व्यक्तीस पाजावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याकडून ओआरएसची पाकिटे विनामूल्य देण्यात येतात. कोणत्याही प्रकारची साथ उद्भवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरीत संपर्क साधावा. नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी आणि साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तसेच जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण पथक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 07262-242574वर संपर्क साधावा. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल राम गिते यांनी केले आहे.