वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सवाचे आज उदघाटन.. जल संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल..

SHARE

चंद्रपूर २ जुन – जल संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल म्हणुन जिल्हा प्रशासन,चंद्रपूर महानगरपालिका व नटराज निकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सवाचे उदघाटन ३ जुन रोजी जुनोना चौक येथील अटलबिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे सकाळी ९ वाजता केले जाणार आहे.
   भारतीय संस्कृतीत पर्यावरण संरक्षण-संवर्धनाला महत्व आहे. पर्यावरणाचे महत्त्व जाणून ही निसर्ग संपत्ती आपल्या पुढच्या पिढीला सुस्थितीत देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. वाढते तापमान व प्रदूषण आज संपुर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे.सध्या जी तापमानवाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचं दिसुन येते. सातत्याने वाढत्या तापमानावर सातत्याने वृक्षलागवड करणे हा परिणामकारक उपाय आहे. याकरिता वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सव ३ मे ते ९ जुन पर्यंत संपुर्ण देशात राबविला जाणार आहे.
   वटवृक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट म्हणजे जलसंवर्धन करणे होय. वटवृक्ष विषारी वायू किंवा कार्बन डाय ऑक्साईड शोषून ऑक्सिजन इतर झाडांपेक्षा अधिक प्रमाणात प्राणवायू हवेत सोडतो व हवा शुद्ध ठेवतो. उन्हाळय़ात या वृक्षामुळे हवेत आर्द्रता सोडली जाते त्यामुळे त्याच्या छायेत गारवा मिळतो, सावली मिळते.
वडाचे झाड हे अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान असते. वडाची बारीक बारीक फळे ते खातात हेच त्यांचे अन्न व त्यांच्या विष्टतून परागीभवनाचे मोठे काम होते. झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रुजून पर्यावरण संवर्धनास पक्ष्यांची मदत होते. पर्यावरणाचा समतोल त्यामुळे राखला जातो.
   वडाची प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणूनच त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे.  वडाची मुळे जमिनीत खूप खोलवर पसरलेली असतात. त्यांची माती धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने जमिनीची धूप कमी होते. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व जमिनीत पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे वटवृक्षाला अत्यंत महत्त्व आहे.
   शहरातील वृक्षारोपण महोत्सव उदघाटन सोहळ्याचा शुभारंभ अटलबिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,आयुक्त विपीन पालीवाल, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे,बनियान ट्री प्लांटेशन फेस्टीवल ग्लोबलची ब्रँड अँबेसेडर अभिनेत्री स्नेहल रॉय यांच्या प्रमुख उपस्थीतीत होणार आहे. सदर कार्यक्रमास अधिकाधिक नागरीकांनी वृक्षारोपण महोत्सवात सहभाग नोंदवुन जलसंवर्धन मोहीमेस हातभार लावण्याचे तसेच अधिक माहीतीसाठी 8668708435 या क्रमांकावर अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button