बुलढाणा : सत्तेसाठी निष्ठा आणि जनसामान्यांचे हित बाजूला सारणाऱ्यांना सुज्ञ मतदार हद्दपार करतील. अशा दगाबाजांना बाजूला सारण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी विधानसभा रणसंग्रामात उतरणार आहे.महाराष्ट्र विकास आघाडी सोबत दिग्गज नेते,पक्ष,संघटना समाविष्ट झाल्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंपही येईल.असं मत महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केले.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन 22 जुलैला लातूर येथे करण्यात आले होते. यावेळी अण्णाराव पाटलांनी उपरोक्त मत व्यक्त करीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सामान्यांच्या प्रश्नावर कुचकामी ठरले आहे. पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा एवढेच समीकरण महायुती महाविकास आघाडीने आजपर्यंत जोपासले. त्यामुळे जनसामान्यांचा विश्वास महायुती व महाआघाडीच्या कार्यपद्धतीवरून कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्र विकास आघाडी 288 जागा लढविणार असल्याचे अण्णाराव पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
संवाद मेळाव्याला महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंत आप्पा उबाळे, मार्गदर्शक साहित्यिक मधुकर सालगिरे, प्रदेशाध्यक्ष नंदेश्वर अंबाडकर, महासचिव अँड अनिरुद्ध येचाळे, कार्याध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, प्रशांत गोडसे, मनोहर इंगळे संदीप वगरे, चंदूअण्णा हजारे, मारुती राठोड, प्रकाश राठोड,असलम शाह आदींसह राज्यातील सर्व लोकसभा उमेदवार, जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
अठरापगड जातीतील वंचित जातींना प्राधान्य देऊ.सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना विधानसभेच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी देण्यात येईल. महायुती महाविकास आघाडीच्या विरोधातील सामान्यांचा आक्रोश लोकसभेत दिसला तोच विधानसभेतही दिसेल असा आशावाद संवाद मेळाव्याचे अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष अंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला. विचार पिठावर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी संवाद मेळाव्यात महाराष्ट्रातील विदारक परिस्थितीवर खंत व्यक्त केली. तर युवक युवतींनी राजकारणात समोर येण्याचे आवाहनह अंबाडकर यांनी केले. प्रास्ताविक महासचिव अनिरुद्ध येचाळे यांनी तर आभार कार्याध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विकास आघाडी सह, राज्यातील संघटना,मित्रपक्ष असलेल्या युवक युवतींची बहुसंख्य उपस्थिती मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरली.