माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुकर अर्ज प्रक्रिया

SHARE

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

शांततेत अर्ज प्रक्रिया करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 04 : राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेत 21 पूर्ण ते 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच ही प्रक्रिया सुकर करण्यात आल्याने महिलांनी शांततेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

माझी लाडकी बहीण योजनेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले आदी उपस्थित होते.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारीत शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यानुसार आता दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यात प्रत्येक पात्र महिलेला 1 हजार 500 रुपयांचा आर्थिक लाभ थेट बँक खात्यात जमा होणार आहे. योजनेसाठी अडीच लाख रूपयांची उत्पन्न मर्यादा असणार आहे. उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी प्रक्रिया करावी लागत असल्याने यातून दिलासा मिळावा, यासाठी केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड सादर करता येणार आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे.

सुधारीत शासन निर्णयानुसार पाच एकरापेक्षा जास्त शेतजमिनीची अट वगळण्यात आली आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चार पुराव्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी ॲप, संकेतस्थळ, सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, तहसील कार्यालय याठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडेही जमा करता येणार आहे. मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. सेतू केंद्रावर अर्ज करण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करणाऱ्या केंद्रावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांच्या निवडीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर समिती असणार आहे. जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री असणार आहे. ही समिती लाभार्थी यादी अंतिम करणार आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी शासनाच्या योजनांमधून दरमहा 1 हजार 500 रूपयांपेक्षा जास्त मदत घेणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. अर्ज करताना महिलांनी आधार लिंक बँक खाते प्राधान्याने द्यावे, यामुळे बँक खात्यात रक्कमेचा भरणा करणे शक्य होणार आहे.

योजनेच्या लाभासाठी कोणत्या मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महिलांना स्वत: अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आवश्यकता असलयास तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button